Saturday, May 9, 2015

एकेक पान गळावया Published: Saturday, May 9, 2015





श्रीनिवास हेमाडे 
'द स्टोरी ऑफ फिलॉसॉफी' सह अनेक पुस्तकांचे लेखक विल डय़ुरांट यांच्या मृत्यूनंतर ३३ वर्षांनी त्यांच्या अप्रकाशित लिखाणाचा 'शोध' लागून ते प्रकाशित झाले आहे. भारतीय इंग्रजी दैनिकांनी दुर्लक्षच केलेले हे पुस्तक म्हणजे ६० वष्रे जगातील विविध संस्कृतींचा अभ्यास, चिंतन व त्यांची महाकथा लिहिल्यानंतर मांडलेले स्वतचे तत्त्वचिंतन आहे..
          समजा, तुमचे एक जुनेपुराणे घर आहे. त्यात एक पोटमाळा आहे, अनेक वष्रे कुणी न फिरकल्याने तो बरीच जाळी जळमटे, कोळिष्टकांनी भारलेला आहे. एके दिवशी कुणी तरी तुम्हाला तुमच्या आजोबांच्या एका वस्तूची माहिती देतो, ती शोधायला सांगतो अन् तुम्ही ती वस्तू शोधण्यासाठी पोटमाळ्याच्या जादूई दुनियेत पाऊल ठेवता. पण अनेक वर्षांची धूळ, जळमटे अंगावर घेऊनही तुम्हाला ती वस्तू सापडत नाही. एकदा दुसरेच काही शोधता शोधता तुम्हाला एक पेटी सापडते. तुम्ही ती उघडता आणि ती वस्तू हाताला लागताच उंच धरून 'सापडली! सापडली!!' (किंवा 'युरेका! युरेका!! युरेका!!!' ) असे किंचाळत उडय़ा मारत सगळ्यांना दाखवीत सुटता; तेंव्हा 'खजिन्याची विहीर' सापडल्याचा आनंद असतो.   
           पण असे खरेच घडले ते पुस्तकांच्या विश्वात. पुलित्झर पुरस्कार विजेता विल् डय़ुरांट (१८८५ ते १९८१) या जगप्रसिद्ध इतिहासकार आणि तत्त्ववेत्त्याचे वर वर्णन केलेले एक पुस्तक असेच गवसले! डय़ुरांटच्या 'फॉलन लीव्हज् : लास्ट वर्ड्स ऑन लाइफ, लव्ह, वॉर अ‍ॅण्ड गॉड' या छोटेखानी पुस्तकाची जन्मकथा अशीच घडली.
         'स्टोरी ऑफ फिलॉसॉफी', 'दि केस फॉर इंडिया', 'दि लेसन्स फ्रॉम हिस्ट्री', 'हिरोज ऑफ हिस्ट्री', 'हिरोज ऑफ सिव्हिलायझेशन', 'दि ग्रेटेस्ट माइंड्स अ‍ॅण्ड आयडियाज् ऑफ ऑल दि टाइम' अशा अनेक ग्रंथांचा कर्ता विल् डय़ुरांटने स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन ही ११ खंडांची प्रचंड ग्रंथमाला लिहून अखिल मानवजातीचे मोठे ऋण अदा केले. त्याच्या साऱ्या ग्रंथांच्या तुलनेत 'फॉलन लीव्हज्' हे तसे लहानखुरे, पण अतिशय मौलिक पुस्तक आहे. 
         त्याचे असे झाले. लेखक, संशोधक, चित्रपट निर्माता आणि पलवान असलेला जॉन आर. लिट्ल हा हरहुन्नरी माणूस डय़ुरांटचा प्रचंड चाहता आहे (लिट्लने ब्रुस ली वर चित्रपट, पुस्तके लिहिली.), गेल्या वर्षी एका नव्या लेखन प्रकल्प आणि चित्रपटासाठी त्याने डय़ुरांटच्या चिंतनविश्वाचा वेध घेतला. त्याच्या वाचनात वृत्तपत्रांची काही कात्रणे आली. त्यात 'मी फॉलन लीव्हज् नावाचे पुस्तक लिहीत आहे,' असे डय़ुरांटने एका चित्रवाणी वाहिनीवरील मुलाखतीत म्हटल्याचे जॉन लिट्लने वाचले. काही वृत्तपत्रांनी डय़ुरांटच्या मुलाखती प्रसिद्ध केल्या, त्यातही या पुस्तकाचे उल्लेख होते. १९६८ ते १९८० दरम्यानची ही कात्रणे होती. 
        डय़ुरांटच्या मृत्यूनंतर (१९८१) त्याचा बंगला वस्तुसंग्रहालयात रूपांतरित झाला होता. जॉन लिट्लने त्या वेळी डय़ुरांटच्या मृत्यूनंतर या बंगल्यात सर्व साहित्याचे जणू उत्खनन केले होते. पण तेव्हा त्याला काहीच सापडले नव्हते, पण २०११-१२ ला नव्याने ही कात्रणे वाचताच त्याने पुन्हा एकदा शोधमोहीम हाती घेतली. त्याने डय़ुरांटची नात मोनिका मिहील हिच्याशी संपर्क केला. तिला 'आपल्या आजोबांनी असे काही लिहिले आहे' हे माहीतच नव्हते. या दोघांनी पुन्हा एकदा डय़ुरांटच्या वस्तुसंग्रहालयात धाव घेतली. पण वस्तुसंग्रहालयाची जागा बदलली गेली. दुसऱ्याच कुणी ते खरेदी केले होते. तेथे काहीच नव्हते. मग नव्या वस्तुसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे (जगातील सर्व अधिकारी करतात तसे) 'असे काही आमच्याकडे नाहीच, नव्हते,' असे सांगून हात वर केले. पण डय़ुरांटच्या मालमत्तेची कागदपत्रे असलेली एक पेटी त्याच वेळी पाठवून दिल्याचे सांगितले. मोनिकाला हे आठवत नव्हते. मग त्यांनी या कागदपत्रांची एखादी प्रत आहे का? असे विचारले तर त्याचाही पत्ता नव्हता. नव्या घरमालकानांही काही माहीत नव्हते. मोनिकाने वडिलांचा बंगला वस्तुसंग्रहालयासाठी दिल्यानंतर एक घर घेतले होते. तिथेही शोधले. पेटी सापडली नाही. मोनिकाने ते घरही विकले, नवे घेतले. जॉन लिट्लने नाद सोडला. नव्या घरातील पोटमाळ्यावर मोनिकाने सारे अडगळ वाटणारे सामान टाकून दिले; पण २०१३ साली कधी तरी काही उचकापाचक करताना ही पेटी तिला सापडली! या पेटीत डय़ुरांट आणि त्याची पत्नी एरिएल यांचा २१०० पानांचा पत्रव्यवहार होता. त्यात या पुस्तकाच्या हस्तलिखिताच्या वेगवेगळ्या आवृत्त्या सापडल्या. डय़ुरांटच्या मृत्यूनंतर, १९८१ नंतर ३३ वर्षांनी त्याच्या एका महत्त्वाच्या पुस्तकाचे मूळ हस्तलिखित सापडले! या पुस्तकाने जागतिक साहित्यात आणि चिंतनविश्वात मूलभूत भर पडल्याच्या प्रतिक्रिया जगभरात व्यक्त करण्यात आल्या. ९ डिसेंबर २०१४ रोजी ते अमेरिकेत प्रसिद्ध झाले. भारतात ते फेब्रुवारी २०१५च्या अखेरीस आले. आज काही प्रमुख शहरांत ते उपलब्ध आहे. वॉल स्ट्रीट जर्नल, न्यूयॉर्क टाइम्स, पब्लिशर्स वीकली, बुकलिस्ट, कीर्कस रिव्ह्य़ूज, न्यू क्रायटेरियनमध्ये त्याची भरभरून परीक्षणे आली. इंटरनेटवर पुस्तकाची प्रचंड चर्चा चालू आहे. मात्र भारतीय इंग्रजी दैनिकांनी या पुस्तकाची दखलच घेतलेली नाही. 
          डय़ुरांटचे सारे लेखन आढावा, विश्लेषण या प्रकारांत मोडणारे आहे. 'द स्टोरी ऑफ फिलॉसॉफी' हे जगभर कित्येक आवृत्त्या निघाल्यानंतर आजही लोकप्रियच असलेले पुस्तक हा पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा उत्तम आढावा आहेच. पण त्याचे पहिले पुस्तक; 'फिलॉसॉफी अ‍ॅण्ड सोशल प्रॉब्लेम' (१९१७) ते 'हिरोज ऑफ सिव्हिलायझेशन' (२०१४) पर्यंत त्याने जगातील विविध घटना, प्रसंग, व्यक्ती यांची माहिती व विश्लेषण दिले. या पाश्र्वभूमीवर 'फॉलन लीव्हज्'चे वेगळेपण असे की, त्याने या पुस्तकात अनेक विषयांवर स्वत:ची मते अतिशय मोकळेपणे पण संक्षेपात मांडली आहेत. ६० वष्रे जगातील विविध संस्कृतींचा अभ्यास, चिंतन व त्यांची महाकथा लिहिल्यानंतर आणि सतत ८० वष्रे असे विविध लेखन केल्यानंतरचे त्याचे हे अतिशय परिपक्व चिंतन आपल्यासमोर येते. जवळपास सारे विसावे शतक अनुभवल्यानंतर मृत्यूच्या दारात अतिशय पक्व मनाने केलेले हे चिंतन म्हणजे आधुनिक कठोपनिषद मानता येईल. 
        या पुस्तकात डय़ुरांटने तारुण्य, प्रौढत्व, वृद्धावस्था, मृत्यू, आत्मा, ईश्वर, धर्म, धर्म आणि नीती, नतिकता, वंश, स्त्रिया, कामप्रेरणा, युद्ध, राजकारण, भांडवलशाही, कला, विज्ञान, शिक्षण आणि इतिहासातील मर्मदृष्टी अशा विविध बावीस विषयांवर आपले मत मांडले आहे. हे विषय मांडताना त्याने अनेक मुद्दय़ांचा परामर्श घेतला आहे. या सर्व चिंतनात डय़ुरांटची पारदर्शी प्रज्ञा आपले दर्शन घडविते. 
         मानवी संस्कृतीचा इतिहासकार आणि विश्लेषक असल्याने पुस्तकाची सुरुवात 'अवर लाइफ बिगिन्स' या लेखाने तो करतो. तारुण्य, प्रौढत्व, वृद्धावस्था, मृत्यू यांचा आढावा घेताना मानवाने निर्माण केलेल्या आत्मा, ईश्वर, धर्म, धर्म आणि नीती, वंश या अनेक संकल्पनांनी त्याच्यावर कसे राज्य केले; कला, प्रेम, कामप्रेरणा, नतिकता यांनी जीवन समृद्ध कसे होते आणि बहुत कष्टाने निर्माण केलेल्या चेतोहर जीवनाची वासलात लावण्यासाठी युद्ध, राजकारण, विज्ञान, भांडवलशाही ही साधने निर्घृणपणे कशी वापरली गेली, यावर मार्मिक भाष्य करतो. 
       पुस्तकाच्या प्रस्तावनेत डय़ुरांट म्हणतो, 'फुशारकी वयाबरोबर वाढते. वस्तुत: गप्प, शांत बसण्याची कला मला शिकली पाहिजे आणि कुठल्याही सुशिक्षित वाचकाला मूलत: आधीच सर्व मते आणि त्यांची विरुद्ध मतेही माहीत असतात, हे मला आज ९५व्या वर्षी समजावयास हवे आहे; पण मी येथे असा घाबरट आणि उतावळा माणूस जगाला -खरे म्हणजे जगातील अब्जांश लोकांनाही नाही- लोकांसमोर मला सगळ्या गोष्टींवर मी काय विचार करतो आहे याची मी बढाई मारतोय!' 
     इतिहासाचे आणि तत्त्वज्ञानाचे निवडक समजूतदार प्राध्यापक आणि काही अभ्यासक यांचा अपवाद वगळता भारतात, महाराष्ट्रात डय़ुरांट वाचण्याची पवित्र पद्धत नाही. कुठल्याही भारतीय अभ्यासक्रमात येण्याचे भाग्य डय़ुरांटला लाभलेले नाही. मग, कधी तरी १९७८-८०च्या दरम्यानचे हे विचार आज सर्वानी का वाचावेत? अनेक कारणे आहेत : लेखन सुगम, थेट मनाला भिडणारे, सुस्पष्ट आहे. सुविचार म्हणून स्वीकारावीत अशी अनेक निरीक्षणे आहेत. त्याहीपेक्षा हे सारे विषय आजही ताजे आहेत आणि नेहमी राहतील. भारताविषयी बोलताना गौतम बुद्ध, बुद्धकालीन भारत, सम्राट अशोक यांचा विशेष उल्लेख करतो. मानवी संस्कृतीचा विकास बुद्ध, येशू यांच्या करुणा आणि नतिकता या प्रेरणांनी भरलेला आहे, यांची योग्य नोंद करतो. 
      प्रकाशक सायमन अ‍ॅण्ड शूस्टरचे व्हाइस प्रेसिडेंट आणि वरिष्ठ संपादक थॉमस लेबीन म्हणतात, 'डय़ुरांट नेहमीच कालसुसंगत आहे. कारण भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचा मार्गदर्शक म्हणून इतिहास कायमच कालोचित असतो. डय़ुरांट इतिहास आहे.' 
      डय़ुरांटची विनम्रता विलक्षण आहे. तो म्हणतो, 'माझ्याकडून कुठल्याही नव्या तत्त्वज्ञानाची किंवा जगाला हादरविणाऱ्या जबरदस्त क्रांतिकारी विचारांची अपेक्षा करू नका; हा सारा मानवी कबुलीजबाब आहे, ती दैवी प्रकटने नाहीत. हे अत्यंत लहान, बारीकसारीक निबंध आहेत. त्यांची सारी प्रतिष्ठा त्यांच्या पल्लेदारपणात, आकारात, मोठे लांबलचक असण्यात किंवा त्यांच्या अगाधतेत, दुबरेधतेत नाहीत, तर हे निबंध जो विषय मांडतात, त्यात त्यांची प्रतिष्ठा आहे. येथे तुम्हाला अस्सल काही सापडले तर हे निर्हेतुकपणे लिहिले गेले आहे आणि दिलगिरी व्यक्त करण्याच्या पात्रतेचे आहे. तेव्हा, बा वाचका, तुला इशारा देतो : स्वत:च्या जोखमीवर या लेखनाची पाने उलट.. पण तुझ्या सहवासात मला उबदार वाटेल रे!!' 

*फॉलन लीव्हज्- लास्ट वर्ड्स ऑन लाइफ, लव्ह, वॉर अ‍ॅण्ड गॉड.
लेखक : विल डय़ुरांट
प्रकाशक : सायमन अ‍ॅण्ड शुस्टर, अमेरिका
पृष्ठे : २०८, किंमत : ५९९ रु. (ऑनलाइन स्वस्त)